तुझ्या भक्तीनं मन माझं करते तुफान !

(चाल: सारी दुनिया का तूही करणधार है..)
तुझ्या भक्तीनं मन माझं करते तुफान !
वाटे मस्तीन निघतो का हा जीव-प्राण ।।धृ0।।
नाचतो-डोलतो लाज नाही  जरा ।
बोलण्याची न  उरते जराही धुरा !!
बालकांचे   परी   डोलते  ही  कमान ! ।।१।।
वस्त्र अंगात राहो न राहो कधी ।
अन्न खावो न खावो न राहो सुधी !!
पागलावाणी कोठेहि, करि गुण-गान ! ।।२।।
कोणी ऐका न ऐका तरी बोलणे ।
आपुल्या प्रीय देवासवे   खेळणे ।।
वृक्ष - वेली - फुले, ऐकती देती  कान ! ।।३।।
मीच गातो नि हसतो मला   पाहुनी ।
कल्पनेच्या भरी, भिन्न नाही कुणी ।।
दास तुकड्या म्हणे, रंगले सर्व रान ! ।।४।।
- मुंबई रेल्वे -प्रवास, दि. २0-१0-१९५९