हावय्रा मना ऐकेना, मज गुरु भक्ती करु देना
(चाल: दिन चार घडीका जीना. . .)
हावऱ्या मना ऐकेना, मज गुरु - भक्ती करु देना ।।धृ0।।
का करितो नश्वर चिंता, सोडुनी सख्या भगवंता ।
गेले वय बघ आता आता, मुकले धन-पुत्रा कांता ।।
समजुनी बोध घेईना, मज गुरु-भक्ति करु देना! ।।१।।
ही बघ रे मोठी माडी, अणि घरात जरिची साडी ।
हातात रुपेरी काठी, सेवेला नोकर पाठी ।।
हे जागिच पडले बघना, मज गुरु-भक्ती करु देना ! ।।२।।
बांबुची चौकट करुनी, निजविले यास त्यावरुनी ।
बांधले जबर दोरींनी, तो पुन्हा न येवो म्हणूनी ।।
कोणास दया येईना, मज गुरु-भक्ति करु देना ! ।।३।।
फुंकतील त्याला सरणी, पाहती सगे नेत्रांनी ।
नच आड येतसे कोणी, राहू द्या जरा तरी म्हणुनी ।।
कुठले रे काका-नाना, मज गुरु-भक्ती करु देना ! ।।४।।
जे प्रभु-भक्तिने धाले, षड्विकार त्यांचे मेले ।
सेवेस्तव रिजले-झिजले, त्यांनीच मृत्युला जिंकले ।।
अजुनहि कीर्ति त्यांची ना,मज गुरु-भक्ती करू देना ! ।।५।।
म्हणूनीच सांगतो नमुनी, लाग रे गुरुच्या ध्यानी ।
तरशिल या दुःखातूनी, सुख पावसी जन्मोजन्मी ।।
तुकड्या म्हणे चल सोडीना,मज गुरु-भक्ती करू देना! ।।६।।
- प्रवास, मानमाड -रेल्वे, दि. १९-१०-१९५९