व्यवहार न कळतो ज्याला, परमार्थ कशाचा त्याला
(चाल: दिन चार घडीका जीना...)
व्यवहार न कळतो ज्याला, परमार्थ कशाचा त्याला ।।धृ0।।
नच माणुसकीचा गंध, आळशी सदा विषयांध ।
नेहमी व्यसनाचा छंद, झगडतो सदा मतिमंद ।।
बोधुनी समज नच आला, परमार्थ कशाचा त्याला ! ।।१।।
स्वच्छता न अंगावरती, कपड्यांवरि उडते माती ।
आंगणी दगड संगाती, नच घरी सारवी भिंती ।।
अति वेळ निजुन उठण्याला परमार्थ कशाचा त्याला ।।२।।
दारात न वेली कसली, फळ-फुले कुठोनी आली ?
रांगोळी कोण मग घाली, ना सडा पडे कधिकाळी ।।
ना प्रेमळ बोली कुणाला, परमार्थ कशाचा त्याला ।।३।।
घरि फोटो प्रभुचा नाही, नच ध्येयवाक्य कोठेही ।
उत्साह कशाचा राही, आळसात जीवन जाई ।।
हरघडी दारुचा प्याला, परमार्थ कशाचा त्याला ।।४।।
उद्योग कोण करणार, म्हणूनीच उपासमार ।
आयते कोण देणार, चोरोनि गडी खाणार ।
नच जवळ राहसा झाला, परमार्थ कशाचा त्याला ।।५ ।।
संताचि संगती करणे, वाटते तयाला मरणे ।
पर-नारी पर-धन हरणे, यातची समजतो जीणे ।।
तुकड्या म्हणे या मनुजाला, परमार्थ कशाचा त्याला ।।६।।
प्रवास मनमाड रेल्वे, दि. १९-१0 - १९५९