तुझ्या भजनाचं प्रेम मना लागू दे हो

(चाल: चोरी करायला कशाला शिकला...)
तुझ्या भजनाचं प्रेम मना लागू दे हो ।
वृत्ति सत्कर्म   करण्यासि, जागु   दे  ।।धृ0।।
नको केवळ भजन, जेथे नाही मनन । 
जरा नाही चिंतन, तल्लिन नाही तन-मन ।।
जे चुकलो ते सुजनासि सांगु  दे  हो ! ।।१।।
मुख नाम स्मरी, मन चोरी करी ।
हात घे खंजेरी, नेत्र विषयांवरी ।।
हे करण्याचे ढंग   सारे   भंगु दे   हो ! ।।२।।
राहो साधे जिवन, सत्य - चारित्र्यपन ।
सेवा करण्याचे गुण, मनि संतोष-धन ।। 
हेचि तुकड्यासि जिवनी या लाभू दे हो ! ।।३।।
                        - गुरुकुंजआश्रम, दि.१७-0५- १९५९