जसा नाम मुखाने गासी रे !
(चाल: डोळे मोडित राधा चाले...)
जसा नाम मुखाने गासी रे !
तसा सुधर गड्या ! आपणासी ! ।।धृ0।।
जसा टिळा लाविसी भाळी, तशी सोड ही व्यसने सगळी ।
दुसऱ्या जे व्हावा म्हणसी, तसा सुधर गड्या ! ।।१।।
माळ गळा जैसी तुळसीची, आस नको मग कधी परस्त्रीची ।
तू जसा साधू सहवासी, तसा सुधर गड्या ! ।।२।।
तू देवाचे मंदिरी जावे, हरिजन तैसे का नच यावे ।
तू जसा सुखाचा होसी, तसा सुधर गड्या ! ।।३।।
दुर्गण सगळे जरी तुज व्हावे, का मग देवासी डुबवावे ?
ही लाज वाटते जैसी, तसा सुधर गड्या ! ।।४।।
तुकड्या म्हणे जैसी वाच्या,होई तसा उध्दारहि साचा।
हे नाही चुकत कुणासी, तसा सुधर गड्या ! ।।५।।
घुडनखापा, दि. १२-0९-१९५९