तुम्ही सगळे स्वार्थ प्रवाही !

(चाल: डोळे मोडीत राधा चाले...)
तुम्ही सगळे स्वार्थ-प्रवाही !
माझी गरज कुणाला नाही ! ।।धृ0।।
मुलगा पैशासाठी झुरतो,म्हणुनीच पाठीशी मरमरतो ।
इच्छा न पुरविता काही, माझी गरज कुणाला नाही ।।१।।
तरुणी भोगासाठिच झुरते, विषय न देता तोंड फिरविते !
क्षणभरी जवळ ना राही, माझी गरज कुणाला नाही ! ।।२।।
मित्रही शक्ति-बुध्दि-भिकारी,लाभ न देता होतील वैरी।
संकटी धाव ना घेई, माझी गरज कुणाला नाही ! ।।३।।
प्रेमाचे सगळे शेजारी, कर्कश होता लपतिल  दारी ।
सगळे जन देतिल ग्वाही, माझी गरज कुणाला नाही ! ।।४।।
धन-धान्याने सत्ता येते, एरव्ही कोणा कोणि न पुसते !
मेला जरि कुठला डोही, मोझी गरज कुणाला नाही ! ।।५।।
विद्वतेची सर्व प्रतिष्ठा, नाही तरी मग कुठली निष्ठा !
फिरता जरी मार्गी दोही, माझी गरज कुणाला नाही ! ।।६।।
आत्मा ओळखुनी जे येती, माणुसकीची तेची मूर्ति ।
तुकड्या त्यासी लीन सदाही, माझी गरज कुणाला नाही ! ।।७।।
                               -घुडनखापा, दि. २१- 0९-१९५९