असाच धावत येशिल का ?

(चाल: नका विचारु देव कसा...)
असाच धावत येशिल  का ?
पावन मजशी करशिल का ? ।।धृ0।।
सुंदर सगुण गुणाचे रुप हे, ठसले नयनी तसे स्वरुप हे
पाहता मन हे तन्मय होते, मनीच ऐसा शिरसिल का? ।।१।।
स्थूल मंदिरी मन शुंगारी । विवेक त्यावर स्थिरता वारी
ज्ञानांजन संकल्प करोनी । व्दैत-भाव मम हरशिल का ? ।।२।।
संसाराचे असत्यपण हे । तुज पाहता वाटे निर्जन हे !
तुकड्यादासा तूच निरंतर ! सूख तुझे ते देशिल का? ।।३।।
                          गुरुकुंज आश्रम, दि. 0३-११-१९५९