खाण्या - पिण्यात मन कसं धसलं हो !

(चाल : डोळे मोडित राधा चाले...)
खाण्या -पिण्यातं मन कसं धसलं हो !
हरी भजनात का नाही बसलं  हो ! ।।धृ0।।
पाहता विषयाचा संग,कसा चढतोसि रंग !
साधु - संगात जायास रुसलं हो,
आणि    चांडाळ    टोळीत   फसल ! ।।१।।
जरा नाही सेवा, घडी - घडी हेवा !
लोभी-लबाडी करूनी जगलं हो,
चोरि    चहाडिन    मुळात   खंगलं ! ।।२।।
वाटे कष्टाची लाज, पाहिजे शोभेचा साज !
धड बोलेना कोणाशी चांगल हो !
सार   आपुल्याच     होशीत    रंगलं ।।३।।
वाहवारे मना ! जरा ऐकुन घेना !
तुकड्या म्हणे हे करु नको नसलं हो,
जे  जनास      वाईट           दिसल ! ।।४।।
           - चोपडा ते अम्बुनी प्रवास, दि.२७-०३-१९५९