सर्व वृथा हे ! मन दे ग्वाही !
(चाल: भावफुलांची माला...)
सर्व वृथा हे ! मन दे ग्वाही !
लोभ कुणाचा नाही ।।धृ0।।
जे जे संग्रह केले धरुनी ।
ते ते मिटले न दिसे फिरुनी ।।
आज दिसे ते उद्या न कांही ।। लोभ0।।१।।
सतत कुणावर प्रेम करावे ।
कोण निभविते नाते भावे ?
सुखदायक तो एकचि राही ! ।। लोभ0।।२।।
अनुभूती आली उदयाला ।
म्हणुनि वाहिली माळ प्रभूला ।।
तुकड्या चरणी स्थीर सदाही ।। लोभ0।।३।।