कोण चालता हो ! आता माझे संगाती ?

( चाल : एक परदेशी मेरा दिल...)
कोण चालता हो ! आता माझे संगाती ?
गावोगावी करण्यासी जन - जागृती ! ।।
सेवा करण्याची कोणा लाभली मती ।
आशापाश सोडोनिया निघा  पुढती ।।धृ0।। 
आता, देशापुढे हेची वाढवूया प्रेम । 
शेती आणि माति यांच्या उन्नतीचे काम !
सहकारी तत्त्व सांगू, करू प्रगती ।
गावोगावी करण्यासी जन-जागृती ! ।।१।।
भ्रष्टाचार गुंडगिरी  बहूत   वाढली ।
फुटाफूट आपसात गावेहि नासली ।।
कोणिना कुणाचे मानी, भ्रष्टली मती ।
गावोगावी करण्यासी जन जागृती  ।।२।।
हरीनाम संकीर्तन चालेना कोठे ।
जिकडे-तिकडे तमाशांचे प्रस्थ हे मोठे ।।
सट्टेबाजी -चोरीजारी, वाढली अती ।
गावोगावी करण्यासी जन-जागृती ! ।।३।।
व्यसनाधीन लोक  बहूसंख्य वाढले ।
तरुणांचे स्वास्थ्य सारे लयाला गेले ।।
तुकड्यादास म्हणे अंत पहावा किती ।
गावोगावी करण्यासी जन-जागृती ! ।।४।।
                            - घुडनखापा, दि. ३0-०९-५९