आड नका येउ चला फिरा माघारा ।

(चाल: एक परदेशी मेरा दिल...)
आड नका  येउ   चला   फिरा  माघारा ।
आळशी लोकांचा मला न॑ लागो वारा ! ।।
नको तुमची पूजा, भक्तिचाहि पसारा !
काय   होते   करुनिया  ढोंग - धतूरा ।।धृ0।।
भजने-कीर्तने मोठी भक्ति दाखवता ।
कामासाठी, सेवेसाठी दुरदुर  पळता ! !
त्याग जरा अंगी नाही, भोगचि सारा !
आळसी लोकांचा मला न लागो वारा ! ।।१।।
पैसे मागोनिया जसे बांधता देऊळ ।
तैसी गरीबांची मनी आहे का तळमळ ?
हेचि सांगते का गीता?-ग्रंथ हा सारा ।
आळसी लोकांचा मला न लागो वारा ! ।।२।।
नाकाहुनी  शेंडीवरी    चंदन   लावावे ।
काळ्या बाजाराने सारे लोक ठगवावे ।।
दया नाही, माया-मनाही, स्वार्थची सारा ।
आळसी लोकांचा मला न  लागो  वारा ।।३।।
गावामध्ये फिरती सदा जसे गावगुंड ।
नाच-तमाशांचे सारे   जाहलेसे   बंड ! !
पुन्हा पाया, लागावया येता सामुर !
आळसी लोकांचा मला न लागो वारा ! ।।४।।
आतातरी घ्या बचन चारित्र्याने वागू  !
सर्व गाव मिळोनीया सुमार्गाला  लागू ! !
तुकड्यादास म्हणे, यारे ! देश उध्दरा ।
आळसी लोकांचा मला न लागो वारा ! ।।५।।
                                -घुडनखापा, दिं. ३0-0९-१९५९