व्हा सावध सकल सुजनहो !

(चाल: जो आवडतो सर्वाला, तोचि आवडे...)
व्हा सावध सकल सुजनहो ! द्या निज-कर्माची ग्वाही ।।
चहू बाजूनि ज्वाल उफळला, ही वेळ  सुखाची  नाही ।।धृ0।।
कोणी कुणावर प्रेम करीना ।
सत्तेसाठी   मुरगळी  माना ।
स्वार्थास्तव करिताती धिंगाणा ।। होss
देइल ही साक्ष कुणीही ।।१।।
नच मानवता उन्नत दिसते ।
नैतिकता ढासळली गमते ।
शब्दांचे अवडंबर  नुसते ।। होss
हे कुठवर आता राही  ।।२।।
म्हणोनी विनंती प्रिय बंधूंना ।
सहकारी जीवन बनवाना ।
सकळावरती प्रेमे करना ।। होss
तरि देश प्रगत हा होई ।।३।।
या संकटिया ! सहकारी व्हा ।
जातियतेच्या विसरुनि भावा ।
तुकड्यादास म्हणे सांगा हो-।। होss
संदेश   भरा   उत्साही ।।४।।
गुरुकुंज आश्रम, दि. २0-0६-१९५९