चल - चल अपुल्या गावाला

(चाल: दुख बोनेपर, सुख कहांसे...)
चल-चल अपुल्या गावाला, राहू नको रे शहराला,
अन्न नाही तर मरशी उपाशी ।।धृ0।।
सोन्यासारखी जमीन सगळी, परंतु राबेना कोणी ।
उठला सुटला नोकर होतो, पेशासाठी लोभानी ।
कोण करी मग काम शेतीचे ?, बोल जरा बंधु मजसी ।।१।।
लाखोनी जन्माला येती, जन्मुनिया   होईल   माती ।
अक्कल नाही संसाराची, मग होइल सगळी हाशी ।
म्हणून सांगतो ऐक गड्या तू,मानु नको शहरात खुशी ।।२।।
काम करावे सगळ्यांनी अन्‌ उपभोगावे सगळ्यांनी ।
तुकड्यादास म्हणे ही नीती, विसरु नका रे कोणी ।
धन - धान्याने, उद्योगाने, गावी वाढवू सुख - राशी ! ।।३।।