थोडकेची पुत्र दे, परि सद्गुणी दे शांत दे
उ (चाल: आकळावा प्रेमभावे....)
थोडकेची पुत्र दे, परि सद्गुणी दे शात दे ।
कार्य-तत्पर शूर दे, सौजन्य निष्ठावंत दे ।।धृ0।।
देशहित कळते जया, उपकार धर्म सुचारुता ।
कृषि -कार्य तत्पर शाहणा,तपि शील बुध्दीवंत दे ।।१।।
उगिच संताने कशाला ?-व्याप आणि संताप तो ।
काळजी करणे नको, या संततीला अंत दे ।।२।।
नांदू दे ही पुत्र-रत्ने, भूषवी कुल आमुचे ।
पावतिल आज्ञा सदा, ऐसेचि कीर्तिवंत दे ।।३।।
विषय-भोगाच्या रुचीने, नाश शरिराचा असे ।
दास तुकड्या सांगतो, शतवर्ष जगु ही भ्रांत दे ।।४।।
गुरुकुंजाश्रम, दि. १२-१0-१९५९