आता मला नको तीर्थ , दुसरे कुणी हो

(चाल: सुखे नांद सखेबाई... )
आता मला नको तीर्थ, दुसरे कुणी हो ।
पाहिले मी गुरुकुंज    चित्त   लावोनी ।।धृ0।।
गाढवाचे घोडे होती, तुकोबाची ऐसी उक्ति ।
प्रत्यक्षची ही   प्रचिती, घेतली   झणी ।।१।।
बालकासी धडा द्यावा, तेसी शिकविती सेवा ।
सहकारी तत्वे सगळी, पटविती मनी ।।२।।
सर्वधर्म वर्म यात, सर्व संत-आदर त्यात ।
सर्व संप्रदाय असती, एकटया   ध्वनी ।।३।।
सर्व मानवांची सेवा, करा धरुनि जीव-भावा ।
दास तुकड्याने कथिला, मार्ग बोधुनी ।।४।।
                                     - सोनेगांव, दि. १५-९-१९५९