अनुभवियांचा संग मिळाया

(चाल: दुर्दैवाचा अवचित सखये...)
अनुभवियांचा संग मिळाया,
जिव    झुरे   माझा ।। प्रभूरे ! ।।धृ0।।
कोठुनि हुडकावी  ही  रत्ने? 
केली असतिल कुणी प्रयत्ने ।।
जाउनी धरु मी चरण तयांचे ।
सांगा      यदुराजा ?  ।। प्रभूरे ! ।।१।।
जिकडे-तिकडे परोक्ष दिसतो ।
अपरोक्षाचा ठावचि   नसतो ।।
म्हणोनि वळतो निश्‍चय मनि या ।
वाटतसे      बोझा !   ।। प्रभू रे ! ।।२।।
आपणची हे   काहि    करावे ।
तरि मग मार्गी अडुनि राहावे ।।
सद्गुरु वाचुनि सोय मिळेना ।
चुकेल     अंदाजा !    ।। प्रभूरे ! ।।३।।
धडपड ही सगळी जीवनाची ।
उरली थोडी वेळ वयाची ।।
तुकड्यादास म्हणे ऐकाहो !-
ऐका   गुरु - राजा !   ।। प्रभू रे ! ।।४।।
                        -गुरुकुंज आश्रम, दि. 0७-११-१९६१