का मज नेता त्या मार्गाने ?

   (चाल : दुर्दैवाचा अवचित सखये..)
का मज नेता त्या मार्गाने ?
अधम जिथे राहती ।। मित्र हो ! ।।धृ0।।
कधी न कुणाचे बरे चिंतती ।
अवघी   टिंगल आणि फजिती ।।
सज्जन जेथे उभे राहता, ग्रासाया पाहती।।१।।
रात्रंदिनी ज्या निशाच दिसते।
मांस - मदीरा जवळी असते ।। 
वेश्येचा बाजार भोवती, दिसती गुंड अती ! ।।२।।
असाल जरि तुम्ही मित्र आमुचे ।
वळवु नका क्षण पाय कुणाचे ।।
जेथे माणुसकी मुळी नाही,चालतसे गमती ! ।।३।।
अमोल जन्मा येउनि    काही -
सार्थक जरी केले मुळि नाही ।।
तुकड्यादास म्हणे यंम येईल,चालुनिया वरती ! ।।४।।
                        -गुरुकुंज आश्रम, दि. 0७-११-१९६१