लोखंडाची तलवारे अन् त्याचिच होते ढाल रे

(चाल: उठा गड्या अरुणोदय झाला...)
लोखंडाची तलवारे अन्‌ त्याचिच होते ढाल रे ।
माणुसची देवता बने अन्‌ तोचि होतसे काल रे ।।धृ0।।
गोड बोलला एक बात रे, त्याने मोहिनी घातली । 
क्रोधाने बडबडला दुसरा,त्याने आफत आणली !।।१।।
चकोर उडती उंच उंच तर अमृत घेती चन्द्राचे ।
विज्ञानाची उंच उडी तर, प्राणची  घेते  दुनियेचे ! ।।२।।
निसर्ग खवळे या खेळाने, पाऊस घाली मनमानी ।
गाव घरे अन्‌ बेट वाहती, विचारती का यास कुणी? ।।३।।
मोठ्यांची ही मौज होतसे, पण गरिबांचा नाश बघा ।
बाँब बोलतो वेळचि नाही, घरा-बाहेरी चला निघा ! ।।४।।
अरे थांब ! ना म्हणे अहिंसा, कोण पुसे म्हातारीला ?
तरुण नवरी कुणा नको ती, पूस जरी ज्याला त्याला ! ।।५।।
काळ बदलला,वेळ बदलली,चूप बसावे का म्हणता ?
बघा बघा तर हाची मानव, काळ बने हातो-हाता ! ।।६।।
निसर्ग-राजा बघे बघे अन्‌ थाप मारी गालावरती ।
तुकड्यादास म्हणे सावध व्हा, ऐकुन घ्या येते क्रांति ! ।।७।।
                                     -राहता, दि. 0४-0९-१९६१