ही का भक्ति खरी ? पळते मन बाहेरी

(चाल: जाने कहाँ गयी...)
ही का भक्ति खरी ? पळते मन बाहेरीss ।।धृ0।।
देह देवापुढे, लक्ष जोड्याकडे,
नेत्र   ते   वाकडे । हात  चोरी  करी ! होss0 ।।१।।
कोण देवा बघे ? पाहति साथी - सगे,
धोतरे-साडि घे ? झाली यात्रा   पुरी ! होss0।।२।।
कीर्तनी ना बसे, सदा तमाशी दिसे,
दुःखि पाहता हसे । वृत्ति श्वानापरी ! होss0 ।।३।।
माळा घालि गळा, चंदनाचा टिळा,
सावकारी करे ! दया ना   अंतरी ! ।। होss0 ।।४।।
दारुचा डोज घे, भ्रष्ट मार्गी निघे,
दास तुकड्या म्हणे । कैसा भेटे हरी ? ।।होss0।।५।।
                        -गुरुकुंज आश्रम, दि. 0१-११-१९६१