कुणि काही म्हणा, मज भान नसे
(चाल: जीवन में पिया तेरा साथ रहे...)
कुणि काही म्हणा, मज भान नसे ।
जड देहाचा अभिमान नसे ! ।।धृ0।।
परि एकचि चिंतन ध्यानि-मनीं,
मनमोहन दर्शन हो नयनी ।
त्यासाठिच जिव वेडावत हा,
हे सकळ जगत् ही ओस दिसे ! ।।१।।
पशु-पक्षी जरी दिसताती वनी,
त्यासीच पुसे मन धावुनिया ।
सांगाल कुणी मनमोहन तो ।
त्या भेटिविणा जिव शांत नसे ! ।।२।।
अविकार प्रभुचे रुप सदा,
मन निर्मल ठेविल सत्त्वगुणी ।
तुकड्या म्हणे, जीवन -मानस हे,
प्रभुच्या स्वरुपाविण व्यर्थ दिसे ! ।।३।।
_ दिल्ली, दि. 0५-0८-१९६0