अंगि नाही ज्ञान, म्हणे साधु मला मान !

(चाल: देव बाजारचा भाजिपाला... )
अंगि नाही ज्ञान,म्हणे साधु मला मान !
साधु नावानं साधु होत  नाहि  होsss !
साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही  हो ! ।।धृ0।।
जंगलच्या अस्वलिला मोठ्या-मोठ्या जटा !
पारधी लंगोटीनं त्यागि दिसे मोठा ! !
कुत्र्याच्या अंगावर भगव्याची छटा !
गाढवाच्या अंगी नाहि भस्माचा तोटा ! !
साधु हॉटेलचा चहा-पाणि नाहि  हो ! ।।१।।
साधूचं साधुत्व नाही  पंथात !
साधूचं साधुत्व नाही तीर्थात ! !
साधूचं साधुत्व नाही  वर्णात !
जाती-पातित नाही साधूची मात !
साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही हो ! ।।२।।
सत्याचरणाविण साधुत्व नाही ।
आत्म - ज्ञानाविण साधुत्व नाही ।
प्रभू - भजनाविण साधुत्व नाही ।
तुकड्यादास म्हणे, ऐका हि ग्वाही ।
साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही हो ! ।।३।।