तुझे ध्यान हे अंति येईल कामी
(चाल: धीरैसे आजा रे..)
तुझे ध्यान हे अंति येईल कामी ।
म्हणोनि प्रभु ! शरण आलो तुला मी ।।धृ0।।
महाकाळ विक्राळ बाधू शकेना ।
तुझ्या चिंतने विघ्न टळताती नाना ।
सदा सौख्य आनंद पावेल प्रेमी ।। म्हणोनि0।।१।।
अहिल्या शिळा स्पर्शता मुक्त झाली ।
महाकिर्ती ही व्यापली, कर्णि आली ।
किती भक्त हे तारिले रामनामी ।। म्हणोनि0।।२।।
अति संकटे व्यापिती मोहजाळे ।
सदा जीव कामादि दुःखात लोळे ।
म्हणे दास तुकड्या सदा हो तुझा मी ।।म्हणोनि 0।।३।।
रामटेक, दि.१९-0१-१९५४