ऐका ऐका त्या देवाची मात
(चाल; काय सांगू त्या देवाची मात..)
ऐका ऐका त्या देवाची मात, गेला सांगुनि पंढरिनाथ ।।धृ0।।
मी सहज बैसलो ध्यानी, भावभक्ति मनी चिंतोनी ।
पहावया देव न्याहाळोनी, झाला प्रकाश अंधारात ।।१।।
देव स्फूर्तिरुपी बोलला, ऐकोनि आनंद झाला ।
जिव कळवळोनि हा आला, लागली ज्योत गगनात ।।२।।
मी होतो पूर्वि मंदिरी, आता राहतो श्रमिका-दारी ।
खाउनि शिळ्या भाकरी, राहतो शेतात अति मौजेत ।।३।।
माझा कधिचा पत्ता बदलला,लोक वेडे जाति तीर्थाला।
हा निरोप द्या सकलाला, करा सेवा मिळूनि खेड्यात ।।४।।
तुकड्याने ऐकोनी ध्वनि, केला आवाज हा गर्जांनी ।
गरिबाची हाक घ्या कानी, तरि देव नेइल मोक्षात ।।५।।
-शहापूर- मार्ग दि. 0६-0९-९९५४