कोणा सांगावी कर्म कहाणी ?
_ (चाल: काय सांगू त्या देवाची घात...)
कोणा सांगावी कर्म कहाणी? देवा वाचूनि ऐकेना कोणी,
हो संतावाचूनि ऐकेना कोणी।।धृ0।।
मजुरीचे पुरेना धन, त्याला खाणारे आहे चार- दोन ।
कैसे द्यावे मुलां शिक्षण ? घरी रडतात केविलवाणी । देवा0 ।।१।।
घरी संख्या काही थांबेना,होती वर्षाचे एक-दोन पुन्हा ।
संसाराची झाली यातना, आता बुध्दि द्यावी देवांनी । देवा0 ।।२।कृ।
झोपडीची मोडली दारे, कुत्री मांजरी घाण करि सारे ।
काय आवरावे आवरणारे? गावगुंड करिति मनमानी । देवा0 ।।३।।
नाही गावात सत्तेचे घर, नाही शेती बरी एकर ।
कैसी पुरेल सांगा भाकर ? झाला जिवाजी वेड्यावाणी। देवा0।।४।।
वाटे तिर्थास निघुनि जावे,विहिरी गंगेत प्राण त्यजावे ।
नाहीतरी काय साधावे ? काही दिसेना या डोळ्यांनी । देवा0।।५।।
श्रीमंत गावचे भले, ते अपुल्याच हौसेत मेले ।
ना जरा साह्य कधी झाले, जरि मरेल कुणि रस्त्यांनी । देवा0।।६।।
जगदीशा ! तुला प्रार्थना, घे घे रे ! करुणा मना ।
तुकड्या म्हणे अशि ही दैना, पाहिली अम्हि डोळ्यांनी ।।देवा0।।७।।
- नांदेड-रेल्वे, दि. १८-0१-१९५५