रिकामा कधी वेळ घालू नको रे !

(चाल: तेरे सहारे सूधर..)
रिकामा कधी वेळ घालू नको  रे !
जनी निंद्य तो मार्ग चालू नको रे ! ।।धृ0।।
सदा कष्ट करुनी शरिरा धरावे, समाजी कुणी वाउगे ना करावे ।
कधी निशचयावीण हालू नको रे ! जनी0 ।।१।।
मुखी प्रेमवाणी अति नम्र राहे, तयासी कुणी आपुला हा म्हणे हे ।
कधी ओखटे व्यर्थ बोलू नको  रे ! जनी0 ।।२।।
जसे आपुला जीव सुखी हो म्हणावे,तसे सर्व लोकासही वागवावे ।
तुकड्या म्हणे पाप तोलू नको रे ! ।। जनी0।।३।।
                                     - परभणी, दि.१३-0१-१९५५