जगती जनार्दन व्यापला हे ऐकले का तू कधी ?
(चाल: आकळाचा प्रेमभांवे..)
जगती जनार्दन व्यापला हे ऐकले का तू कधी ?
कर्तव्य ही पूजा प्रभूची ऐकले का तू कधी? ।।धृ0।।
ऊठ मग हो कार्य तत्पर, ग्राम-सेवा साधण्या ।
आळसे झोपू नको, कर पार विषयाची नदी ।।१।।
अधिक संग्रह पाप समजुनि, दान दे धन-भूमिचे ।।
कष्ट करुनी जग जगीं या, भक्ति ही प्रभुच्या पदी ।।२।।
आपुल्यासम कर जिवांना, निश्चयी निर्मळ मनी ।
विश्व हे घर आपुले समजोनि घे वचनो सुधी ।।३।।
जो मिळे तो मित्र अपुला, समजुनीया वाग हे ।
दास तुकड्या सांगतो, हे लक्ष विसरे ना कधी ।।४।।
- वरखेड-मार्ग, दि. 0१-0४-१९५५