विश्वचि घर भासुनी
(चाल: वाजवी पावा गोविंद...)
विश्वचि घर भासुनी, जीव हा होत सदा दंग ।
प्रगटतो भक्तीचा रंग । असा हा संतांचा संग ।।धृ0।।
सेवेची सत्ता, लाभते भक्तांच्या हाता ।
होतसे ब्रह्मचि निज अंग । असा हा संतांचा संग ।।१।।
अहंकार गळतो, लोभ हा त्यागाने पळतो ।
चढतये प्रेमाची भंग । असा हा संतांचा संग ।।२।।
दुःख न मरणाचे, मिळे जरि सुख न राज्याचे ।
म्हणे तुकड्या न उरे व्यंग । असा हा संतांचा संग ।।३।।
- वरखेड, दि.0३-0४-१९५५