जसे आले मिळूनि भजनासी

(चाल: काय सांगू त्या देवाची मात...)
जसे आले मिळूनि भजनासी, सांगा निरोप जनलोकांसी ।।धृ0।।
गांजा दारु पिऊ नका कोणी, याने पडाल बहु यातनी ।
चहा-बिडी द्या हो सोडोनी, तेणे पावाल आरोग्यासी । सांगा0।।१।।
घरोघरी गायिला पाळा, दहि - दुधाने भरवा वाडा । 
गरिबांची मुले सांभाळा, खुशी होईल तरी सकलासी ।। सांगा0।।२।।
खोटा व्यापार हातचा सोडा,धंदा ईमान धरुनी जोडा।
कापु नका कुणाचा गळा, तरि देव नेईल स्वर्गासी ! सांगा 0।।३।।
कष्टाने करा भोजन, खाऊ नका फुकाचे  अन्न । 
नको गावोगावी भांडण, हा न्याय पाळा सर्वाशी ।। सांगा0।।४।।
साधुसंता दुरुनि वंदावे, ते सांगेल तेचि करावे । 
तुकड्या म्हणे धरा जिव भावे या ऐकोनिया वचनासी ।। सांगा0।।५।।
                                    - जळगांव दि. १९-0१-१९५५