मनी बोधवितो, सुख शोधवितो

(चाल : हे दीन दयाघन करुणासागर सुनिये..)
मनी बोधवितो, सुख शोधवितो । ध्वनी मंजुळ गुरुदेवाचा ।
घे ठाव अखिल हृदयाचा ।।धृ0।।
निर्मल ही प्रार्थना-अर्थना । होत जीवा सुखदायी ।
अनेक देवा एक करोनी । भ्रम हा नाशी मनाचा ।। घे ठाव0।।१।।
समुदायाला स्थीर करोनी । चित्त  मोहवी  त्यांचे ।
पतंग जैसा ज्योति झडप घे । दिसे भाव जनतेचा ।। घे ठाव0।।२।।
एक स्वराने गाती-नमविती, शीर नप्र-भावाने ।
वाटे भू-वैकुंठ योजिले । स्वर्ग गमे जीवनाचा ।। घे ठाव0।।३।।
सर्व अम्ही सर्वांकरिता ही । ज्ञानज्योति दे हाती ।
तुकड्यादास म्हणे मी रंगलो । घेऊनी पाठ तयाचा।। घे ठाव0।।४।।