कधि येशिल मनमोहना !

(चाल: तू येशिल केव्हातरी..)
कधि येशिल मनमोहना ! पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।ध0।।
ती मधुर तुझी बांसरी, ऐकु दे एकदा तरी ।
करी प्रसन्न अमूच्या मना,पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।१।।
भारता ग्रहण लागले, अति गुलाम   जन   जाहले ।
तोडण्या येई बंधना, पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।२।।
ऐश्वर्य    तुझ्या   वेळिचे, गोपाळ - गोपी - मेळिचे ।
नच स्वप्नि दिसे त्या खुणा,पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।३।।
तुकड्याचि आस कर पुरी, तू गरुड सावरी  हरी ।
घे धाव नंद - नंदना, पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।४।।