झाला देशव्यापि आकांत

(चाल: विझले रत्नदीप नगरात...)
झाला   देशव्यापि  आकांत ।
अजुनी का निजले यदुनाथ ?।।धृ0।।
घाबरले हे दीन - जन सारे ।
अन्नावाचुनि मरति बिचारे ।
कोणी न घेई करुणा त्यांची,द्यावी कुणाला हाक ?।। अजुनी 0।।१।।
जिकडे - तिकडे   गट  पक्षांचा ।
तांडव दिसतो अति स्वरुपाचा ।
ध्वनि ऐकेना कोणी कुणाचा,एक दुजावर मात ! ।। अजुनी 0।।२।।
तरुणांना नच भानचि उरले ।
यौवन त्यांचे व्यसनी  मुरले ।
तुकड्यादास म्हणे का धरले-हट्ट असे हृदयात ? ।। अजुनी0।।३।।