विद्वानांनो ! व्यक्तीसुखास्तव, ही विद्वता नाही तुम्हा
(चाल: अवताराचे कार्य कराया...
विद्वानांनो ! व्यक्तिसुखास्तव, ही विद्वता नाही तुम्हा ।।धृ0।।
असतिल जे जे अनपढ कोणी,शिकवुनि त्या विद्वान करा ।
तरीच फिटे हे ऋण देशाचे, हे का माहित नाहि तुम्हा ?।।१।।
बहुजन जनता या देशाची-जोवरी गावंढळ दिसते ।
तोवरी किंमत नाही कुणाला, निवडूनि पुसतो कोण तुम्हा ? ।।२।।
आपण तरले नव्हे नवल ते ! संतमूनि हे उपदेशी ।
ऐकुनि या वचनासी त्यांच्या, सत्कार्याचा मार्ग क्रमा ।।३।।
घराघरातूनि भारतवासी, नीटनेटका जव दिसला ।
तुकड्यादास म्हणे त्या दिवशी, शिरसावंद्य तुम्हीच अम्हा ।।४।।
- गुरुकुंज, दि. 0६-११-१९५५