वरी राम बांधोनिया सेतु गेला । सवे घेउनी भक्तिने मारुतीला ।। महत्त्वे शिरी वाहि पाषाण खोटे । जसेच्या तसे राहिले टोळगोटे

(भूजंगप्रयात)
वरी राम बांधोनिया सेतु गेला ।
सवे घेउनी भक्तिने मारुतीला ।।
महत्त्वे शिरी वाहि पाषाण खोटे ।
जसेच्या तसे राहिले टोळगोटे ।।१।।
प्रभू जाति तो बैसले पंकि खाली ।
अजूनी तया उंच ना बुध्दि आली ।।
प्रसंगी जरी मानिले लोकि मोठे ।
जसेच्या तसे राहिले टोळगोटे ।।२।।
तसेचि प्रसंगी महामूर्ख तेही ।
धरोनी वरी आणिती श्रेष्ठ पाही ।।
परी वेळ गेल्या ठरावे नरोटे ।
जसेच्या तसे राहिले टोळगोटे ।।३।।
महा क्रांतिकर्त्या प्रभू कृष्णनाथे ।
गबाळासही थोर केले स्वहाते ।।
तया मागुती यादवी घोर थाटे ।
जसेच्या तसे राहिले टोळगोटे ।।४।।
असे ज्यास वाटे सदा उच्च व्हावे ।
तयाने स्वये लोकसेवे झिजावे ।।
स्वकष्टाविना प्रेम ना शक्ति साठे ।
जसेच्या तसे राहिले टोळगोटे ।।५।।
स्वत:च्या परीने बघावे जगाला ।
तरी लोकही मान देती तयाला ।।
जरी गर्व अंगी, तरी द्रोह वाटे |
जसेच्या तसे राहिले टोळगोटे ।।६।।
उगाची कुणाच्या सवे राहुनीया ।
महामूर्ख ते इच्छिती मान व्हाया ।।
कधीही परी ना टिके, ओख वाटे ।
जसेच्या तसे राहिले टोळगोटे ।।७।।
म्हणोनी अम्ही सांगतो मानवाला ।
कुणाचा उगाची भरोसा कशाला?।।
म्हणे दास त॒कड्या, धरा लक्ष्य मोठे ।
जसेच्या तसे राहिले टोळगोटे ।।८।।