करावे काय शिक्षण ते ?
(चाल: नसावा लोभ दुष्टांचा...)
करावे काय शिक्षण ते ? कधि कामासि येईना ।
पुस्तके पाठ करुनीही, लाभ अंती नसे कोणा ।।धृ0।।
राम भजने बहू गाती, हटेना विषय - प्रवृत्ती ।
बाचती दिसभर पोथी, जीवनी अर्थ उमजेना ।।१।।
वैद्यकी पास जरि केली, न कळती लक्षणे काही ।
लाभ तरि का कुणा सांगा? असा हा रोज धिंगाना ।।२।।
शेतकी शिकुनिया आले, नोकरी नाहि-घरी बसले ।
लाज वाटे स्वत: करण्या, बघा हा शेतकी - बाणा ।।३।।
कसे जगतील जन सांगा? तया ना कर्म, ना नेकी ।
म्हणे तुकड्या हवे पैसे, कष्ट सहवे न इतरांना ।।४।।
- सन १९६४