वासने तुज भोवती, किती जन्म घालावे अम्ही

(चाल: सावळ्या रे निर्मला रे का असा...)
वासने तुज भोवती, किती, जन्म घालावे अम्ही ।
भोग हे संपेल का, भोगूनि  होतिल   का   कमी ।।धृ0।।
इंद्रियाचे    लाड    पुरवावे, तरुणपणी   बोलती ।
नाचती ते स्वैर म्हणुनी कोणि ना त्या अडविती ।
गलित इंद्रिय जाहले, परि तू न अजुनीही  नमी ।।१।।
केस पिकले, दात पडले, पाय तनघडती अता ।
थरथरे  सारी   त्वचा, थांबेचिना   ती   थांबता ।
नेत्र गेले, कान बुजले, बुध्दिची   सुटली   हमी ।।२।।
लागली काठी करी, कफ पित्त  उसळे   बाहेरी ।
स्वैर सुटले मुत्र मल ते, राहती    जे   लाजरी ।
तरि न तुजशी लाज ये,तू पुन्हा पुन्हा विषयी रमी ।।३।।
नाश केले जन्म सारे, पुत्र   पौत्रा    पाहता ।
लाडवीता हसविता आणि पाळण्यासी झुलविता ।
आज तरि कर मुक्त मज, हे चित्त   रंगू   दे   गुणी ।।४।।
दास तुकड्या सांगतो, वेराग्य टिकु   दे   वृत्तिचे ।
नष्ट आसक्ती करी, परि ध्यान लागो भक्तिचे ।
मरणि तरि लय साधु दे, त्या सद्गुरु पद चिंतनी ।।५।।