संसाराचा बोझ वाहता

(चाल: संतोके सहवास में रहकर...)
संसाराचा बोझ वाहता, लागलास मरणाला ।
नेशी    साथी    कुणाला, बोल,  बोल,   बोल ।।धृ0।।
जन्मभरी भोगुनी वैभवा, नाश धनाचा केला ।
रक्त शोषुनी गरीब जनांचे, सुख ना दिले कुणाला ।
मान नाही अन्‌ किर्ती न कांही,उगाच फिरला हेला । नेशी0 ।।१।।
धर्म वर्म ना शिकला, साधू-संग मुळी नच केला ।
तीर्थ न केले, व्रत ना धरले,दान न दिले कुणाला ।।
विषय भोगता इंद्रिय गळले, मोह न अजुनि सुटला । नेशी 0।।२।।
धन दारा सुत नाती गोती, व्याप करुनिया बसला ।
प्रेम न केले  शेजाऱ्यावर, दुसऱ्या   पाहूनि   हसला ।।
प्रभु स्मरणाला वेळचि नव्हती,सांगशी काय यमाला । नेशी 0।।३।।
ये शुध्दिवरी अता तरी तू, भजरे भज गोपाला ।
आसक्तीचा बंध तोडुनी, बघ   देवाची   लीला ।।
तुकड्यादास म्हणे नाही तर, जा फिर चोऱ्यांशीला । नेशी 0।।४।।