वाच वाच रे गीता ! वीरा

     (चाल: सुंदर गाव बनाओ अपना...)
वाच वाच रे गीता ! वीरा वाच वाच रे  गीता ।।धृ0।।
भयाभीत मोहाने अर्जुन, जेव्हा हतबल होता ।
ज्ञान-बोध देवुनि श्रीकृष्णे,गांडिव दिधले हाता ।। वीरा0 ।।१।।
तेचि खरे तव साथी, ज्यांची उज्वल कीर्ति दिगंता ।
थोर असे जरी,पण अन्याई, बघ सांगे  प्रभु  आता ।।वीरा0 ।।२।।
पाहू नको नाती अणि जाती, पक्षापक्ष अहंता ।
सत्याचे वाली होउनिया, सुखवी भारतमाता।। बीरा0 ।।३।।
उज्वल धर्मा रक्षण करण्या, अपुला जन्म सुबीता ।
ब्रीद सोडणे महापाप हे, ऐक ऐक गुणवंता ।। बीरा0।।४।।
तीच वेळ अणि तोच काळ हा, आला अपुल्या माथा ।
तुकड्यादास म्हणे निर्भय हो, प्रार्थुनिया भगवंता ।।बीरा0।।५।।