रामनाम सतत मुखी, राहू दे मना
(चाल: मंगलमय नाम तुझे...)
रामनाम सतत मुखी, राहू दे मना ।।धृ0।।
जन्माचे पोषक जे, मृत्यूला सार्थक जे ।
त्रिविध तापनाशक, गुण गाउ दे मना ।।१।।
मानव-जिवनात अती, संकट हे येती किती ।
टाळण्यासी विघ्न-दुःख जाउ दे मना ।।२।।
सत्चर्या साधु संग, कीर्तन भजनात रंग ।
येईल ते तीर्थ संत, पाहू दे मना ।।३।।
आश्रम, घर पुनित ज्यांचे, पूजक जे सुजनांचे ।
दर्शन मज नित्य त्यांचे, घेऊ दे मना ।।४।।
तुकड्यासी जनसेवा,घडू देया जिव-भावा ।
नम्र, अहंकार - रहित, होऊ दे मना ।।५।।