शांति कुणाला कशी लाभते ? वाढतसे ज्वाला
( चाल : बारबार तोहे क्या समझाये...)
शांति कुणाला कशी लाभते ? वाढतसे ज्वाला ।
विचारा जाऊनि शहाण्याला ।।
पेटले हे रान सारे, कोण विझवि याला ?
विचारा जाऊनि शहाण्याला ।।धृ0।।
दुरुनि बघावे का म्हणता ? कोण तुम्हा सोडील तसे ?
जरि मरती पशु - पक्षि वनी,तुम्ही तरी वाचाल कसे ?
ही कसली रीती - नीति असे ! !
म्हणुनि सांगतो, सावध व्हाना, सोडुनि ममतेला -
विचारा जाऊनि शहाण्याला 0।।१।।
कर्तव्याचे काम जिथे, तेथे दुर्बल घात करी ।
उपदेशाचे काम नसे, तेथे वाचा मौन बरी ।।
अरे ! चला पुढे मन स्थिर करी ।।
हेच सांगते मित्रा ! गीता तुझ्या अर्जुनाला ।
विचारा जाऊनि शहाण्याला 0।।२।।
आपण आपुल्यासाठी नसू, जगू-मरु समुहासाठी ।
समुहाचे कल्याण तिथे,खरी शांति अपुल्याच दिठी ।।
काळ असा हा उठाउठी ।।
मित्रा ! हे न जयाला कळले, त्याचा जन्म फुका गेला ।
विचारा जाऊनि शहाण्याला 0।।३।।
खरी शांति त्यांना मिळते, ज्यांचे जीवन त्यागि असे ।
सेवा व्रत आजन्म जया रोग भोग काहीच नसे ।।
ऐ ! भारतियांनी बना तसे ।।
तुकड्यादासा हेचि आवडे, सगळ्या संताला ।
विचारा जाऊनि शहाण्याला 0।।४।।