अग्नि भडकला युद्धाचा, अन् तू आळशी
(छंद: चाल : हरिका नाम सुमर नर प्यारे...)
अग्नि भडकला युध्दाचा,अन् तू आळशि होऊन बसे ।
तरुण असोनी रक्त न उसळे, नौजवान तुज म्हणा कसे ? ।।धृ0।।
लाव छातिला माती उभा हो, सैन्यामध्ये भरती व्हाया ।
देशासाठी, धर्मासाठी, अर्पण कर ॒ अपुली काया ।।
मेला तर तू शहीद होशिल, कीर्ति तुझी देशावरती ।
जिंकलास तर वीर म्हणोनी, पदवी देतिल राष्ट्रपती ।।
सिंहासम ही छाती तुझी, अन् पोलादासम हात तुझे ।
बिजलीसम ललकार तुझीही, तोफ, बाँब करि हात तुझे ।।
या भारत देशाचे तुजवर, कर्ज असे, ऋषिऋण असे ।
तरुण असोनी रक्त न उसळे, नौजवान तुज म्हणा कसे ।।१।।
मागे का पाहतोस पुढे चल, शत्रूवरती मात करी ।
न्यायाची भूमिका तुझी तर, काळाची का भीति धरी ?।
एक दिवसही फुका न घाली, संकटवेळा घरि आली ।
संकटावरी मात करी तू, हो शत्रूचा काळ बली ।।
तत्वासाठी जगा, लढा अन् लावा अपुला प्राणपणा ।
देह जाइ पण देश न जावो, नरवीरांचा हा बाणा ।।
तुकड्यादास म्हणे भारत हा, शूरवीरांचा देश असे ।
तरुण असोनी रक्त न उसळे, नौजवान तुज म्हणा कसे ।।२।।