चोरी करायला कशाला शिकला रे ? दारु

(चाल : भूमिदानाचं वेडं कसं लागल ?...)
चोरी करयला कशाला शिकला रे ? दारु पिण्याला कशाला शिकला ? ।।धृ0।।
करि शेतात काम, काढि अंगात घाम, घेई देवाचं नाम
दूर सारी हा आळस-खोकला रे ! ।। दारु0।।१।।
गावी आलं भूदान, वाढलं कष्टाचं रान,भूमिसम-प्रमाण 
आता मजुरांचा हंगाम पिकला रे ! ।। दारु0।।२।।
गड्या ! ईमानाला जाग, सेवाकार्याला लाग, देवा सद्बुध्दि माग ।
करु नकोस खोट्यांच्या नकला रे ! ।। दारु0।।३।।
बेड्या पडता हातात,लाथा जोड्यांचा खात,घातला जाशिल जेहलात ।
सारे म्हणतील गावातुन हाकला रे ?।। दारु0।।४।।
दारू येता अंगात, जाउन पडशिल नाल्यात, माशा घुसतिल तोंडात
सारा मैल्यानं   न्हाऊन   रंगला   रे ।। दारु0 ।।५।।
ऐक तुकड्याची हाक, नको गमावू नाक, होईल जिवनाची राख ।
राहि कीर्तीने    जगात    चांगला  रे ।। दारु0 ।।६।।
                                    - पंढरपूर, दि. २२-0७-१९५३