अम्ही सर्व सुखी हो, म्हणुनी प्रार्थु ईश्वरा
(चाल: किस देवताने आज मेरा...)
अम्ही सर्व सुखी हो, म्हणुनी प्रार्थु ईश्वरा ।
आम्हात नको गरीब-अमीर भेद हा जरा ।।धृ0।।
कष्ट करुनि राबु अम्ही आमुच्या परी ।
ईश्वर - स्मरणांत सदा झिजवु वैखरी ।
सर्व मिळुनि सेवु अता,धन-धान्य कोठरा ।।१।।
जो कसेल भूमि तया दान देऊनी ।
जो करिल काम त्यास दाम पुरवुनी ।
संत - सुजन बुध्दिवंत, सेवु आदरा ।।२।।
जात-पात नाहि अम्हा पंथ अन्यही ।
एक पंथ मानवता मानु सर्वही ।
नच कोणि दिसो दीन-हीन, देश - मंदिरा ।।३।।
मित्रता परस्परात, वाढवू अम्ही ।
दुष्ट बुध्दी दुर्व्यसना करुनिया कमी ।
तुकड्याची आस पुरविण्यास,विनवू श्रीधरा ।।४।।
- मुंबई, दि.३१-०७-१९५३