सुख व्हावया परस्परास धर्म बोलिला

(चाल : किस देवताने आज...)
सुख व्हावया परस्परास धर्म बोलिला ।
कधि ना पडो कुणा उपास, धर्म बोलिला ।।धृ0।।
एक सुखी, एक दुखी विषमता अशी ।
समाज-दोष हा बघुनी, ये कुणा खुशी ?
हे सहम होईना प्रभूसी, धर्म बोलिला ।।१।।
सर्व मिळूनी सकळांना साह्य देउनी ।
जिवनोन्नती व्हावयास झटा समजुनी ।
दुर्व्यसना हटविण्यास   धर्म  बोलिला ।।२।।
सत्य सदा वदनि वदा, स्मरुनि ईश्वरा ।
साह्य करा सकळिकास, करुनिया त्वरा ।
तुकड्या म्हणे व्हा उदास, धर्म बोलिला।।३।।
                                         -मुंबई, दि. 0१-0८-१९५३