स्वतंत्र झाला देश तुझा तू, वीर शिपायी देशाचा
(चाल: असार जिवित केवळ माया...)
स्वतंत्र झाला देश तुझा तू, वीर शिपायी देशाचा ।
अक्षरशत्रू राहू नको बघ, पाठ घेई साक्षरतेचा ।।धृ0।।
समाज-शिक्षण घेऊनि सगळे,भारत हा उन्नत बनवी ।
शेतकरी तू, कामकरी तू,तुझ्या वैभवाला मिळवी ।।१।।
तुझे गाव नन्द्नवन करुनी, वैभव सारे प्राप्त करी ।
मानवधर्म जगाला तारी हीच याद राहू दे पुरी ।।२।।
राष्ट्रपिता गांधीजी अपुले,वचना त्यांच्या पूर्ण करी ।
कलापूर्ण संसार तुझा कर, मागु नको ही माधुकरी ।।३।।
गेले ते बहु दिवस दुःखाचे, पुढे नको ती वेळ अता ।
तुकड्यादास म्हणे सावध हो,वाढवि बल अणि बुध्दिमता ।।४।।