शेतकय्रांनो ! कामकय्रांनो ! समाजशिक्षण घेऊ
(चाल: अवताराचे कार्य कराया...)
शेतकऱ्यांनो ! कामकऱ्यांनो ! समाजशिक्षण घेऊ चला ।।धृ0।।
आजवरी दुसऱ्याने केले, राज्य अपुल्या देशाचे ।
स्वतंत्र झाला भारत अपुला, निरोप सकळा देऊ चला ।।१।।
निरक्षराला साक्षर करुनी, देशाचे कल्याण करू ।
सौंदर्याने नटवू खेडी, उत्तम राहणी सेवु चला ।।२।।
बसणे उठणे टापटिपीचे, तसेच सुंदर घर बनवू ।
समुदायाने करुनि प्रार्थना, निर्मत्सर मनि होउ चला ।।३।।
भेद्-भाव हा जातिपातिचा, विसरुनि जाऊ या पुढती ।
मानवधर्मा स्थापन करुनी, न्यायनीति वाढवू चला ।।४।।
तुकड्यादास म्हणे घ्या कानी,सुंदर वेळ दिसे पुढची ।
देशासाठी बनू शिपायी, भूषण सगळे लेवू चला ।।५।।