ऊठ गड्या ! दिवस निघाला
(चाल: जीवन की नाव ना डोले....)
ऊठ गड्या ! दिवस निघाला,
रामधून आली घराला ।।
आतावरी झोपी का गेला?
काय सांगशील जगाला रे ।।धृ0।।
झाडझूड झाली सारी, रांगोळिया घरोघरी ।
आम्र-तोरणे उभारी, आनंदल्या नर-नारी ।
तूच कसा झोपूनि गेला ?
थोडी समज देइ मनाला,
ऊठ चाल होय रांगेला रे ।।१।।
आजवरी आळसानं, घेतलासे जीवप्राण ।
पोटा नाही जरा अन्न, अंगी नाही वस्त्र जुन ।
बोल काहि अपुल्या मनाला,
देशधर्म नष्ट का झाला?
कोणि ना विचारि कुणाला रे ।।२।।
स्वातंत्र्य भारतात, आलं गड्या ! दुमदुमत ।
सोडू नको आता हात, होई मस्तचि तू यात ।
काय विचारतोसि कुणाला,
गुंड घालताति रे घाला,
पहा चोर छातिशी आला रे ।।३।।
साफ करी घरदार, आपुला परका व्यवहार ।
भांडण हे सोड सारं, करी एक जातवार ।
तरिच लाभे शांति मनाला,
सुख मिळे सर्व जनाला,
जीवप्राण लावि पणाला रे ।।४।।
स्वराज्य लाभलं हे, सुराज्य हाती घे हे ।
सेवा कर सेवका ! हे, हात उभारोनि पाहे ।
तुकड्याची हाक घेण्याला,
तूच खरा मित्र होण्याला,
चाल पुढं सूर्य निघाला रे ।।५।।