वाहवा रे दारुची नशा, आलि अवदशा

              (चाल: शिवराया जाइ तो रणा...)
वाहवा रे दारुची नशा, आलि अवदशा, हुशारी गेली ।
कंगाल   जाहला    देश, गुलामी    आली ।।धृ0।।
धनवान किती बलवान, कुलवान थोर अणि सान ।
बुध्दिमान किती गुणवान, उद्योगी   मजूर  किसान ।।
दारुच्या पायि गांजले, भिके लागले, मान्यता नुरली -
त्या   परकीयांनी  अशी   दुर्दशा   केली ।।१।।
धोरवी अंगी आणावी, दुसऱ्यास हौस शिकवावी ।
व्यसनात मती भ्रमवावी, घरदार शेति   बुडवावी ।।
हा असा बनविला पिसा, केलि दुर्दशा, पडतसे नाली -
गेलि रे लाज अन्‌ शरम, भ्रष्टता व्याली ।।२।।
ओळखी कुणाची नाही, ना मान पान मुळि काही ।
व्यभिचार जार-कर्माही, होतसे   साह्य   उत्साही ।।
खातात मांस हौशिने, वधोनि मने, जिवा नच वाली -
नच पुरे गाय अन्‌  बकरी   शौकाखाली  ।।३।।
तोंडात शिवी अति नंगी, नित राहि तमाशा-रंगी ।
घर पराधीन, बहु तंगी, परि तया सदाही गुंगी ।।
वडिलांचे नाव बुडविले, द्रव्य उडविले,जाहला खाली । लागला   भिकेला,   देह - दुर्गती   झाली ।।४।।
वाढले व्यसन हे भारी, शाहण्या - धन्या-घरदारी ।
कोणि ना दिसे कैवारी, यांतुनी काढि-बाहेरी ।।
व्हा तयार अजुनी तरी, नशा ही पुरी, पाताळी घाली -
तुकड्यास दिसेना चिन्ह बरे  या  काली ।।५।।