अवतरला गुरूदेव भारती
अवतरला गुरुदेव भारती ।
संचरला मनि भरला, स्फुरला,
झाला जनतेचा सारथी ।।धृ0।।
ग्रामसफाई करुनि सकाळी ।
रामधून ही घेउनि वेळी ।
शुध्द मनाने,निज नियमाने,ठेविति दारी देवी आरती ।।१।।
उद्योगी राष्ट्रकार्य म्हणुनी ।
कृषि-शक्तीस्तव राबति झिजुनी ।
देह सदा देशाच्या कामी,राष्ट्रपित्या भूषविण्या जगती ।।२।।
सायकाळी निर्मळ वेळी ।
स्वच्छ होउनी बसती सगळी ।
राहति येउनी प्रीय प्रार्थने,स्थितप्रज्ञता हृदयी धरती ।।३।।
एक जात अणि एक पंथही ।
असो साधने जरि अनंत ही ।
सगळ्या धर्मा आदर देउनी,बंधुभाव ठेवण्यास चित्ती ।।४।।
तुकड्यादास म्हणे या सगळे ।
सोडुनिया हृदयातिल काळे ।
नांदु सुखाने अपुल्या देशी,सदैव मिळविण्या सुखशांति ।।५।।