झरझर झरझर या पुढती या

(चाल: भारत माझा स्वतंत्र झाला...)
झरझर झरझर या पुढती या । गर्जत गर्जत सांगु जगा या ।
स्वतंत्र झाला भारत सखया ! या धावुनिया साभाळाया ।।धृ0।।
वीर तरुणहो ! ऐका ऐका । एक   करोनी  रावा - रंका ।
सरळ चालवू अपुली नौका । या धावुनिया साभाळाया 0 ।।१।।
जातियता ही धाडु लयाला । पंथावरती घालुनि घाला ।
करु शिपायी ह्या सगळ्याला । या धावुनिया सांभाळाया 0 ।।२।।
एकचि पंथ करुया मोठा । देश सुखी हो   चारी   वाटा ।
उपटनि काढू असेल काटा । या धावुनिया सांभाळाया 0।।३।।
सद्धर्माची जागवु ज्योति । जिवा-जिवांतुनि वाढवु नीति 
करू सोने जरि असेल माती । या धावुनिया सांभाळाया 0।।४।।
तुकड्यादास म्हणे देशाला । फळाफुलांनी सुखवू त्याला ।
स्वातंत्र्याच्या उभवु ध्वजाला । या धावुनिया सांभाळाया 0।।५।।