चला रे जाऊ शेगावी, गजानन

(चाल : अगर हे ग्यान को पाना...)
चला रे जाऊ शेगावी, गजानन ! सत-नमनासी
फिटे भव भ्रांतिची भीती, लाभते  दर्शने  काशी ।।धृ0।।
दिगंबर रुप हे त्याचे, नसे मुळी  भान   देहाचे ।
समाधी ध्यान हे त्यांचे, अखंडित  अंतरंगासी ।।१।।
अशी ज्याची असे भक्ती, तयाला दे तशी शक्ती । 
मुमुक्षू देत विरक्ती, सारिखे दास  अणि   दासी ।।२।।
पहाता वेडियावाणी परिसता   भासतो  ज्ञानी ।
वृत्ति गमते जसे पाणी,मिळाली धार स्वरुपासी।।३।।
कृपा होता तुटे व्याधी, मिळे परमार्थिया संधी ।
म्हणे तुकड्या चला आधी,संत हा देव अविनाशी।।४।।